Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. यासह सध्या जनतेमध्ये लॉकडाऊनची (Lockdown) भीतीही दिसून येत आहे. मात्र आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, ‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे.’

अशाप्रकारे हे सिद्ध झाले आहे की, राज्यात लॉकडाऊन लागू केले जाणार नसून अजून कठोर नियम लागू केले जातील. राजेश टोपे पुढे म्हणाले, ‘गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे. राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून, दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.’ (हेही वाचा: Coronavirus In Aurangabad: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय)

दरम्यान, सध्या मुंबईतील कार्यालये आणि दुकानांतील कर्मचाऱ्यांच्या संख्येवर निर्बंध लादले जाऊ शकतात. त्याचबरोबर धार्मिक स्थळांसाठीही नवीन नियम लागू केले जाऊ शकतात. महाराष्ट्रात वाढती कोरोनाची प्रकरणे लक्षात घेता नागपूर, अमरावती आणि परभणी येथे आंशिक लॉकडाऊन लावण्यात आले आहेत. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी रविवारी महाराष्ट्रातील उस्मानाबादमध्ये 'जनता कर्फ्यू' दरम्यान प्रशासनाने कोविड-19 च्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करावे आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे असे आवाहन केले. याशिवाय लातूर जिल्हा प्रशासनानेही रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.