गोरगरीबांसाठी छत्री वाटपाच्या कार्यक्रमावेळी माजी महापौर आणि नगरसेविका यांच्यात चक्क हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. हा प्रकार मुंबई मधील मीरा रोड परिसरात घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. गीता जैन असे या माजी महापौरांचे नाव असून रुपाली मोदी हे या परिसरातील नगरसेविकेचे नाव आहे. रुपाली या आ. मेहता समर्थक असून मेहता व जैन यांच्यातील वादंगातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकारामुळे स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज झाले आहेत.
हाटकेश परिसरातील इमरान हाश्मी यांनी, माजी महापौर गीता जैन यांच्या हस्ते छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र ऐनवेळी पाऊस आल्याने, रस्त्यामध्ये बांधलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या शेडमध्ये हे छत्री वाटप सुरु झाले. त्याचवेळी रुपाली मोदी पतीसह तेथे पोहचल्या व इथे हा कार्यक्रम होऊ शकत नाही असे सांगितले. आपल्या नगरसेवक निधीतून शेड बांधली असून परवानगी घेतली आहे का? चला बाहेर निघा, असे सर्वांना सांगून दमदाटी करू लागल्या. (हेही वाचा: तरुण-तरुणींच्या गटात 'फ्री स्टाईल' हाणामारी; सिडको कॉलेज परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद)
इथे थोडी बाचाबाची झाल्यावर जैन व मोदी यांच्यात चक्क हाणामारी सुरु झाली. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून शिवीगाळही सुरु झाला. या प्रकरणामध्ये शेवटी काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. भाईंदर विधानसभा मतदार संघातून भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून दोन्ही बाजूंनी प्रयत्न चालू असल्याने हे भांडण उद्भवल्याचे बोलले जात आहे.