छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj)    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा कोसळला आहे. 4 डिसेंबर 2023  रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. "शिवाची महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळल आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो.सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता" असे स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.  नौदल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या कामाबद्दल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुरुवातीपासून चौकशीची मागणी केली होती. या झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. (हेही वाचा -  Sindhudurg ST Bus Accident: सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह ११ जण जखमी)

नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक जगभरात पोहचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.  400 वर्षापूर्वी  उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील काम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल.  तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे. असे आमदार आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.

दरम्यान या घटनेनंतर आमदार वैभव नाईक यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या निकृष्ट कामासाठी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची त्यांनी तोडफोड ही केली आहे.  "हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने ही प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले? यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे”, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत केली आहे.