Photo Credit- Facebook

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024: यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी विशेष ठरत आहे. या मतदारसंघात एमआयएम पक्षाचे नेते तथा विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाचे नेते तथा मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या तिरंगी लढतीमुळे झालेल्या या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. 13 मे 2024 रोजी या मतदारसंघात मतदान झालं. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या मतदारसंघात एकूण 63.07 टक्के मतदान झाले आहे. (हेही वाचा:Bhiwandi Lok Sabha Election 2024: सुरेश म्हात्रे की कपिल पाटील? भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोण ठरणार विजयी )

इम्तियाज जलील खुर्ची राखणार का?

इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार आहेत. 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे जलिल यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत निवडणूक जिंकली होती. मात्र यावेळची निवडणूक जलील यांच्यासाठी फार सोपी नव्हती. यावेळी अनेक मुस्लीम मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी राहिल्याचे दिसले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचाही त्यांना पाठिंबा नव्हता त्यामुळे यावेळी जलील यांना दलित मतदारांचीही हवी तेवढी साथ मिळालेली नाही. त्यामुळे जलील यांच्यासाठी ही निवडणूक कठीण ठरल्याचा दावा केला जातोय. जलील यांनी काही दिवसांपूर्वी आदर्श घोटाळ्याविरोधात मोठे आंदोलन उभे केले होते. त्याचा फायदा जलील यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलील या निवडणुकीत कितपत यशस्वी ठरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एकूण किती मतदार?

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 59 हजार 710 मतदार आहेत. त्यात 10 लाख 77 हजार 809 पुरुष तर 9 लाख 81 हजार 773 महिला व 128 इतर मतदार आहेत. यातील 12 लाख 99 हजार 40 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या जागेवर एकूण 63.07 टक्के मतदान झाले आहे. मतदान केलेल्यांमध्ये 7 लाख 9 हजार 816 पुरुष मतदार तर 5 लाख 89 हजार 184 महिला मतदार आणि 40 इतर मतदान होते.

 अटीतटीची लढत

छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha) यावेळी जातीय समीकरण फार महत्त्वाचं ठरलं. याआधीच्या अनेक निवडणुकांत संभाजीनगरात 'खान की बाण' हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे. पण यावेळच्या निवडणुकीत ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दादेखील तेवढाच महत्त्वाचा ठरला. याच कारणामुळे छत्रपती संभाजीनगराच्या निवडणुकीत एकदम अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.