खुशखबर! दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई लोकलमध्ये सुरु होणार वायफाय सेवा
Wifi in Mumbai Local (Photo Credits: Wiki commons/Pixabay)

आजकाल इंटरनेट हा माणसाच्या आयुष्याच्या अविभाज्य घटक झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. मोबाईलसह सतत 24X7 आपल्या सोबत असलेला इंटरनेट मुंबई लोकलने प्रवास करताना रेंज नसल्यामुळे अचानक गायब होतो. त्यावेळी प्रवाशांची निराशा होते आणि विनाकारण त्याचा मोबाईल डेटा कमी होतो. अशा वेळी प्रवाशांची निराशा होऊ नये म्हणून लवकरच मुंबई लोकल (Mumbai Local) मध्ये वायफाय सेवा सुरु करण्यात येणार आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, इंटरनेटविना मनोरंजन करण्यासाठी मध्य रेल्वेने 'कंटेट ऑफ डिमांड' अंतर्गत लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांना ही सुविधा वापरता येणार आहे.

मुंबई लोकल ने प्रवास करताना अनेकदा बोगद्यांमुळे मोबाईल नेटवर्क जाते, त्याचबरोबर इंटरनेटही जाते. अशावेळी मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर काही काम करत असलेल्या किंवा मनोरंजन कार्यक्रम पाहत असलेल्या मुंबईकरांचा हिरमोड होतो. आणि रेंज मिळेपर्यंत त्यांचा मोबाईल डेटाही संपत जातो. त्यांचा हा मनस्ताप कमी व्हावा म्हणून मध्य रेल्वेने लोकल डब्यात वायफाय बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हेदेखील वाचा- खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार

मध्य रेल्वेवरील 165 लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाणी यांचा समावेश असेल. याचा वापर करण्यासाठी प्रवाशांना केवळ मोबाइल वायफाय सुरू करणे गरजेचे आहे. वायफाय लॉगइन केल्यानंतर प्रवाशांना 'प्री-लोडेड' माहिती मोबाइलवर पाहायला मिळेल. यामुळे प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची देखील बचत होईल, अशी माहिती अधिकृत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

हेदेखील वाचा- चर्चगेट - विरार AC Mumbai Local 14 सप्टेंबर पासून आठवड्याचे सात ही दिवस धावणार; पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी मोठा दिलासा

सध्या लोकलमध्ये वायफाय बसविण्याचे काम सुरू आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या सुविधांचा प्रवाशांना लाभ घेता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्री-लोडेड वायफायसाठी मध्य रेल्वेने खासगी कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार केला असून या करारानुसार मध्य रेल्वेच्या तिजोरीतही लाखो रुपयांची भर पडणार आहे.

या सुविधेमुळे तांत्रिक बिघाड, मेल-एक्स्प्रेसला जाण्यासाठी लोकल थांबवणे अशा त्रासामुळे खोळंबलेल्या प्रवाशांना काहीअंशी नक्कीच समाधान मिळेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.