सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये दुष्काळाने थैमान घातले आहे. उत्तर महाराष्ट्र तसेच सांगली जिल्ह्यातील अनेक गावे भीषण दुष्काळाला तोंड देत आहेत. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पाहणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता परिस्थिती इतकी भयान आहे की दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने उपाययोजना करणे सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबरअखेर राज्यात दुष्काळ जाहीर केला जाईल अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रम आणि भाजप कार्यकर्ता मेळाव्यासाठी चंद्रकांतदादा पाटील सांगलीतील जतमध्ये आले होते, यावेळी त्यांनी राज्यातील तब्बल 172 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती दिली.
महाराष्ट्रात हजार गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण झाली; मात्र या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे ही योजना बारगळली. तसेच अजूनही जत तालुक्यातील 42 गावांच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यासंदर्भात कर्नाटकशी बोलणे करून महाराष्ट्रातून जादा पाणी सोडून कर्नाटकातून या 42 गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. तसेच ज्या तालुक्यांत 31 टक्क्यांपेक्षा जास्त दुष्काळ आहे त्याच तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार आहे.
ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर होणार आहे; पण जत तालुक्यासाठी रविवार, दि. 21 पासून टंचाईतून मदत मिळणार आहे. यामध्ये चारा छावण्या, वीज बिलात सवलत, शालेय विद्यार्थ्यांची फी माफ आदी सुविधा मिळणार आहेत.