Clean-Up Marshal | X@mashrujeet

बीएमसी (BMC) चं क्लिनअप मार्शल (Clean-Up Marshal) सोबतचं एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आता 5 एप्रिलला संपणार आहे. दरम्यान नागरिकांकडून क्लिन अप मार्शल बाबत आलेल्या तक्रारींमुळे आता त्यांची बंद करण्याचा निर्णय झाल्याचं वृत्त आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नागरी अधिकारी आता त्यांच्या Nuisance Detector Squad,ला बळकटी देण्याची योजना आखत आहेत, जे नियम मोडणार्‍यांना अधिक प्रभावीपणे ओळखण्यावर आणि शिक्षा करण्यावर लक्ष केंद्रित करतील.

2007 मध्ये सुरू करण्यात आलेल्या क्लीनअप मार्शल योजनेला नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींमुळे अनेक वेळा स्थगिती आणि सुधारणांचा सामना करावा लागला आहे. या तक्रारी प्रामुख्याने मार्शलच्या कृतींमुळे आल्या होत्या. ज्यामुळे ही योजना अनेक वेळा स्थगित करण्यात आली होती. पण गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बीएमसीने शहरातील 24 प्रशासकीय वॉर्डमध्ये 12 एजन्सींची नियुक्ती करून ही योजना पुन्हा सुरू केली. प्रत्येक वॉर्ड मध्ये नियम मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे काम करण्यासठी 30 मार्शल नियुक्त करण्यात आले होते.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, शौच करणे किंवा कचरा टाकणे यासारख्या स्वच्छतेच्या बाबतीत नियम मोडणार्‍या व्यक्तींना दंड करण्याचे अधिकार मार्शलना देण्यात आले होते. उल्लंघनानुसार 200 ते 1000 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी, बीएमसीने एक मोबाइल अॅप देखील सुरू केले जे मार्शलना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दंड पावत्या जारी करण्याची परवानगी देतो. याव्यतिरिक्त, व्यक्ती क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन दंड देखील भरू शकतात, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ होते आणि प्रणाली अधिक पारदर्शक बनते. पण बीएमसीला अजूनही मार्शल गैरवर्तन करत असल्याबद्दल आणि नागरिकांकडून पैसे उकळत असल्याबद्दल अनेक तक्रारी मिळत आहेत.

"कामामध्ये निष्काळजीपणा दाखविल्यामुळे, क्लीनअप मार्शल योजनेत सहभागी असलेल्या 12 पैकी सात खाजगी एजन्सींवर कारवाई करण्यात आली. या एजन्सींना 60 लाखांपेक्षा जास्त दंड भरावा लागणार होता, परंतु आजपर्यंत ही रक्कम थकित आहे. त्यांचा करार 5 एप्रिल रोजी संपत असल्याने, आम्ही पुढील नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे त्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. असे FPJ  च्या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे.

क्लीन-अप मार्शलनी सार्वजनिक ठिकाणी थुंकताना पकडलेल्या 1.45 लाख नागरिकांकडून दंड वसूल केला आहे, ज्यामुळे 4 एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान एकूण 4.54 कोटी रुपये दंड वसूल झाला आहे.