कोरोना बाधित रुग्णांची संख्या मुंबईत (Mumbai) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून हा याचे निदान लवकरात लवकर कळणे गरजेचे आहे. असे असताना देखील मुंबईतील मेट्रोपॉलिस लॅबला (Metropolis Labs) कोविड-19 चे रिपोर्ट देण्यास 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागत असल्या कारणाने या लॅबला 1 महिन्यासाठी COVID-19 ची चाचणी घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. सलग दुस-यांदा ही कारवाई करण्यात आल्यामुळे या लॅबच्या कार्यक्षमतेवर प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून एप्रिल मध्येही प्रशासनाकडून या लॅबला नोटिस पाठविण्यात आली होती.
HT ने दिलेल्या रिपोर्टनुसार, मेट्रोपॉलिस लॅबमध्ये कोविड-19 चे रिपोर्ट देण्यास 24 तासांहून जास्त वेळ लागत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत होत्या. त्यानुसार, मंगळवारी म्हणजेच 9 जूनला या लॅबला नोटिस पाठविण्यात आल्याचे अतिरिक्त नागरी आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले. याआधील एप्रिलमध्येही याच कारणामुळे मेट्रोपॉलिस लॅबला कारणे दाखवा नोटिस पाठवली होती. त्यानंतर 1 आठवड्यासाठी या लॅबला COVID-19 ची टेस्ट घेण्यास बंदी घातली होती.
मात्र या कारवाईनंतरही या लॅबमध्ये काही सुधारणा न झाल्याने यावेळीस आम्ही 1 महिन्यासाठी या लॅबवर COVID-19 ची टेस्ट घेण्यास बंदी घातली आहे. टेस्ट चे रिपोर्ट देण्यास उशीर करणे म्हणजे कोरोनाचे रुग्ण वाढविण्यास वा कोरोनाचे फैलाव होण्यास कारणीभूत ठरू शकते. त्याचबरोबर यामुळे योग्य वेळेस उपचार न झाल्यास मृतांचा आकडा वाढविण्याचाही धोका असतो. कारण चाचणीचे रिपोर्ट आल्याशिवाय कोणावरही उपचार करता येत नाही.