कोरोना व्हायरसचा (Coronavirus) महाराष्ट्रात पसरत चाललेला संसर्ग दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. याचा परिणाम संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये यासाठी महाराष्ट्रात संचारबंदीही लागू करण्यात आली. मात्र अशा वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बळाचा गरज भासत आहे. सर्व पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली असून पोलिसांवर देखील प्रचंड ताण पडत आहे. म्हणून देशाचा जबाबदार नागरिक म्हणून 'आपण आपली पोलीस सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतल्याचे ' भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जाहीर केले. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा पोलिस प्रशासनावर ताण पडत असल्याने 'मी माझी पूर्ण सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला आहे' असे ट्विट भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिले आहे.
चंद्रकांत पाटील यांचे ट्विट:
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात मा.पंतप्रधान @narendramodi यांच्या आवाहनानुसार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, देशात संचारबंदी लागू आहे.याचा पोलीस प्रशासनावर ताण पडत आहे.याचा विचार करून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मी माझी पूर्ण सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 27, 2020
हेदेखील वाचा- Coronavirus Lockdown चं बंधन पाळत नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी बाहेर पडा: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
पुण्यापासून सुरू झालेलं कोरोना व्हायरसचं संकट आता महराष्ट्रात पसरयला सुरूवात झाली आहे. दरम्यान आजच्या घडीला महाराष्ट्रात 136 कोरोनाबाधित असून पुणे जिल्ह्यात 32 रूग्ण आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे आता यापैकी 10 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुण्याच्या नायडू रूग्णालयामध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना बरा होऊ शकतो त्यामुळे त्याच्याबाबत भीती बाळगू नका तर दक्ष रहा असे आवाहन सध्या आरोग्यमंत्रालयाकडून करण्यात येत आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 724 पर्यंत पोहचला असून त्यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे.