Dead | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई मध्ये शॉपिंग मॉलच्या बेसमेंट मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आह मंगळवार 21 जानेवारी दिवशी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ही माहिती दिली आहे. मॉलच्या कर्मचार्‍याला या महिलेचा मृतदेह दिसला. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार अद्याप या मृत महिलेची ओळख पटलेली नाही. ही घटना भांडूप (Bhandup) येथील आहे.

रिपोर्ट्सनुसार, महिलेचा मृतदेह बेसमेंट मध्ये पाण्यात तरंगताना दिसला. सध्या हा मृतदेह पोस्ट मार्टम साठी पाठवण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यूचं प्रकरण नोंदवलं आहे. ही महिला 30-35 वर्षांची असल्याची माहिती आहे.

Dreams Mall मध्ये सकाळी 9.40 च्या सुमारास तुंबलेल्या बेसमेंट मध्ये तिचा मृतदेह आढळला आहे. भांडुपच्या व्हॅन मोबाईल युनिटच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमॉर्टमसाठी मुलुंड सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तपास सुरू असल्याने महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान 2021 मध्ये कोविड दरम्यान आग लागून 11 लोकांचा मृत्यू झाल्यापासून भांडूपचा हा ड्रीम्स मॉल बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी महिलेचा मृतदेह कसा आला ? याचा शोध सध्या घेतला जात आहे.