Aurangabad Train Accident: महाराष्ट्र सरकारकडून औरंगाबाद रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर
CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

आज (8 मे) पहाटे औरंगाबाद मध्ये करमाड स्थानकाजवळ रेल्वे अपघातामध्ये 16 मजूरांचा दुर्देवी अंत झाला आहे. या अपघातानंतर महाराष्ट्रासह देशभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना महाराष्ट्र सरकारने मदत जाहीर केली आहे. ज्या मजुरांचा या रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून   प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी घरी परतण्यासाठी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. रात्री चालत चालत ते करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे रेल्वे रुळावरच झोपले. आज पहाटे जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली आल्याने यामधील 16 जणांचा दुर्देवी अंत झाला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून औरंगाबाद रेल्वे अपघात चौकशीचे आदेश; रूळावर मजूर पाहून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न अयशस्वी अन अनर्थ घडल्याची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील सामान्य नागरिकांसह राजकरण्यांनी या औरंगाबाद दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान रेल्वे मंत्रालयानेही आता या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारने  दिले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

ANI Tweet

24 मार्चपासून भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आता तो 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या ट्रेन दोन्ही राज्यांच्या समन्वयाने आणि दोन स्थानकांमध्येच चालवणार आहेत. त्यामुळे अनेकांना आपल्या घरी परतण्याचे वेध लागले आहेत.