मानसी दीक्षित ( Photo Credit: Facebook )

मुंबईतील मालाडमध्ये सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने एकच खबळब उडाली आहे. वृत्तानुसार, ही मृत मुलगी 23 वर्षांची असून मॉडल होती. मानसी दीक्षित असे त्या मृत मुलीचे नाव होते. या प्रकरणी पोलीसांनी मुजम्मल सईद नावाच्या एका इसमाला अटक केली आहे.

माहितीनुसार, मुजम्मल सईदने मानसी दीक्षितला आपल्या घरी बोलावले होते. त्यानंतर काही कारणांवरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि रागाने मुजम्मलने चाकूने तिची हत्या केली. त्यानंतर त्याने मानसीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरुन मालाडच्या लिंक रोडवर फेकला. पण त्यावेळी तेथे उपस्थित लोकांनी हा प्रकार पाहिला आणि त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तीन तासाच्या आत पोलीसांनी मुजम्मल सईदला अटक केली.

आयपीसीच्या कलम 302 आणि 201 अंतर्गत मुजम्मल सईद विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याने पोलिसांनी याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. सईद हा मूळचा हैद्राबादचा असून त्याचे कुटुंब नावाजलेले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील ओशिवारा भागात फॅशन डिझाईनर सुनीता सिंगचा मृतदेह तिच्या राहत्या घरी सापडल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.