अनुराधा पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार (Photo Credit : Twitter)

महाराष्ट्र सरकार तर्फे, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कै. विंदा करंदीकर यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार (Vinda Karandikar Jeevan Gaurav Puraskar) प्रदान करण्यात येतो. यंदाच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा पाटील (Anuradha Patil) यांची निवड करण्यात आली आहे.

सोबतच मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरीसाठीच्या श्री.पु. भागवत पुरस्कारासाठी, पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाची (Padmagandha Prakashan) निवड करण्यात आली आहे. आज मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दोन्ही पुरस्कारांची घोषणा केली.

5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. तर 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे श्री. पु. भागवत पुरस्काराचे स्वरूप आहे. शासनातर्फे हे दोन्ही पुरस्कार सन 2010-11 पासून देण्यात येत आहेत. जीवन गौरव पुरस्कारासाठी सर्वप्रथम प्रा. के.ज. पुरोहित  यांची निवड करण्यात आली होती. 2017 सालचा जीवन गौरवह श्री. मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आला होता. (हेही वाचा: Sahitya Akademi Award 2019 Full List: कवयित्री अनुराधा पाटील यांच्या काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार घोषित)

दरम्यान, मराठी कवयित्री व साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका अनुराधा पाटील यांचा जन्म 5 एप्रिल 1953 साली जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांच्या प्रसिध्द कवितासंग्रहांमध्ये दिगंत, तरीही, दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ, कदाचित अजूनही यांचा समावेश होतो. दुसरीकडे 1988 साली सुरु झालेले पद्मगंधा पब्लिकेशन्स, हे मराठीतील एक प्रख्यात, प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध प्रकाशनगृह आहे.