Anil Deshmukh:  आपल्याला न केलेल्या गुन्हांची शिक्षा देण्याचं काम सुरु - अनिल देशमुख
Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआय (CBI) पाठोपाठ ईडी या केंद्रीय संस्थेनेही गुन्हा दाखल केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून येत आहे. या वृत्ताचा दाखला देत अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी त्यांच्यावर दाखल होत असलेले गुन्हे आणि चौकसी यांबाबत केंद्र सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. तसेच, अनेक गौप्यस्फोटही केले आहेत. आपण गृहमंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयांमुळे केंद्र सरकार नाराज झाले असावे. तसेच, आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला देण्याचा उद्योग सुरु असल्याचेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपांची दखल घेत सीबीआयने म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अनिल देशमुख यांची चौकशी सुरु केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. दरम्यान आता सीबीआय पाठोपाठ ईडीनेही गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, Sachin Vaze Dismissed: सचिन वाझे बडतर्फ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे आदेश)

अनिल देशमुख यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, आपल्यावर केवळ राजकीय हेतूने आरोप केले जात आहेत आणि चौकशीही सुरु आहे. मी गृहमंत्री असताना विविध प्रकरणांमध्ये कारवाई केली होती. यात अन्वय नाईक, सीबीआयला राज्याच्या परवानगीशिवाय तपासाला बंदी, दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्ये प्रकरणी एसआयटी नेमणूक अशा विविध प्रकरणांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांमुळे केंद्र सरकार नाराज झाले असावे. त्यामुळेच माझ्यावर चौकशी आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली असावी, असे म्हटले आहे.