Unseasonal Rain and Garpit | | | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र हे निर्माण झाले आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह अनेक जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अनेक ठिकाणी शेतपिकांसह घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आज देखील राज्यातील अकोला, बुलडाणा, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; विदर्भात गारपिटीचा इशारा)

राज्यातील अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याला गारपिठीसह अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागांना अवाकाळी पावसाचा मोठा फटका बसला. हवामान खात्याने अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला होता.

आज दुपारी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेगाव शहरात मुख्य रस्त्यावर आणि रेल्वे स्टेशन परिसरात अनेक झाडे उन्मळून पडल्याने त्यात ३ वाहनांचे नुकसान झाले तर तिघे जण जखमी झाले. तसेच जिल्ह्यातील खामगाव संग्रामपूर परिसरातसुद्धा अवकाळी पाऊस पडत आहे. आता बुलडाण्यात देखीलपावसाला सुरुवात झाली आहे.