Ajit Pawar On Dhirubhai Ambani: 'चोरुन' की 'सोडून'? अजित पवार यांचे धिरुभाई अंबानी यांच्याबद्दलचे वक्तव्य वादात
दिवंगत उद्योगपती धिरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कथीतरित्या वादग्रस्त विधान केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या विधानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
Ajit Pawar Controversial Statement: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (AP) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे मोकळेढाकळे व्यक्तीमत्त्व. त्यांच्या भाषणाची शैलीसुद्धा काहीशी रांगडी. जे मनात येईल ते बोलून टाकले, अशी. पण कधी कधी या त्यांच्या स्वभावामुळेच नाहक वाद उत्पन्न होतो. आताही तसेच घडले आहे. निमित्त होते बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक (Malegaon Sugar Factory Election) प्रचार. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी उद्योगपती दिवंगत धिरुभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्याबद्दल एक वक्तव्य केले. या वक्तव्यावरुनच वाद निर्माण झाला आहे. त्या वक्तव्याबाबतचा एक कथित व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. काय आहे ते वक्तव्य आणि वाद? घ्या जाणून.
'सोडले' की 'चोरले'?
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक रंगात आली आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनीच ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ते स्वत: प्रचारासाठी पाहुणेवाडी येथील ओम साई लॉन्स येथे आयोजित सभेतला आले होते. सभेत बोलताना त्यांनी "पंपावर पेट्रोल सोडूनच धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला" असे विधान त्यांनी केले. सोशल मीडियावर मात्र, वेगळेच विधान व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये "पंपावर पेट्रोल चोरुनच धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला" असे ते बोलल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे 'सोडले' की 'चोरले'? नेमका शब्द काय यावरुन वाद निर्माण झाला आहे. (हेही वाचा, New Liquor Shop Licence: अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने मांडला 2,160 नवीन दारू दुकानांना परवानगी देण्याचा प्रस्ताव; शिवसेनेच्या आक्षेपानंतर योजना स्थगित)
पाहुणेवाडी येथील सभेत बोलताना अजित पवार
दरम्यान, याच सभेत बोलताना अंबानी यांच्या विधानाला जोडूनच "मी जर सहकार मोडायला निघालो असतो, तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का? माझा खाजगी कारखाना काढायची तयारी नव्हती. सरकारने बंधनं घातली, पण आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवायला दिले नाहीत", असेही अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांचे व्हायरल झालेले विधान
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत श्री नीलकंठेश्वर पॅनेलच्या माध्यमातून अजित पवार स्वत: रिंगणात उतरले असून, त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यामुळे कधी नव्हे ती ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून, लढत तिरंगी, चौरंगी किंवा बहुरंगी होण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे. दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष या निवडणुकीत आमनेसामने येतात की आणखी काही वेगळी सूत्रे फिरतात याबाबत उत्सुकता आहे. निवडणूक रंगात आली असली तरी तिने अद्याप अत्युच्च टोक गाठले नाही. तरीसुद्धा उभ्या महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2025 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

