Mumbai Cha Raja 2026 Theme: यंदा गणेशगल्लीत साकारणार वैष्णव सांप्रदाय दर्शविणारी वारी; पहा झलक
शतकपूर्ती कडे प्रवास करणारा मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती यंदा वैष्णव सांप्रदाय दर्शविणारी वारी या संकल्पनेवर आधारित सजावटी मध्ये विराजमान होणार आहे. 14 सप्टेंबर पासून पुढील 10 दिवस भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.
Mumbaicha Raja Decoration 2026: 'मुंबईचा राजा' (Mumbaicha Raja) म्हणून बिरूद मिरवणारा लालबाग परिसरातील गणेशगल्लीचा (Ganesh Galli) गणपती यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 99 वे वर्ष साजरं करणार आहे. 29 जुलैला गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर बाप्पाचा पाद्यपूजनाचा सोहळा संपन्न झाला. याचवेळी यंदाच्या मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती मंडळाची सजावट थीम जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी गणेशगल्ली मध्ये वैष्णव सांप्रदाय दर्शविणारी वारी साकारली जाणार आहे. "वारी चुकायाची नाही" देवा माय-बापा "तुझी वारी चुकायाची नाही" म्हणत मंडळाने पहिली झलक शेअर केली आहे. या सजावटीचा खास टीझर शेअर करण्यात आला आहे.
लालबाग मध्ये काल 'मुंबईचा राजा'चा पाद्यपूजन सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंडळाचे अध्यक्ष आणि नगरसेवक किरण तावडे, मूर्तिकार आकाश तिरमल आणि कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
मुंबईचा राजा गणेशगल्लीची यंदा कशी असेल सजावट?
मुंबईतील लालबाग परिसरातील गणेश गल्ली येथील 'मुंबईचा राजा' हे मंडळ १९२८ सालापासून आपल्या भव्य देखाव्यांसाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जाते. मुंबईचा राजा हे मंडळ दरवर्षी वेगळ्या आणि सर्जनशील थीमसाठी ओळखले जाते. जगप्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती, ऐतिहासिक किल्ले, पौराणिक कथांवर आधारित देखावे यामुळे हे मंडळ भाविकांचे विशेष आकर्षण ठरते.
वारीचं महत्त्व: महाराष्ट्राच्या समता आणि भक्तीच्या परंपरेचा प्रवास
महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर शेकडो वर्षांची भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याची परंपरा आहे. वारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही भेदभाव नसतो. जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कोणताही फरक न करता सर्व वारकरी एकाच रांगेत, एकाच भावनेने विठ्ठलनामाचा गजर करत चालतात. समाजातील उच्च-नीचतेच्या भिंती वारीच्या काळात पूर्णपणे गळून पडतात, हेच या परंपरेचे खरे सामर्थ्य मानले जाते.
वारीची परंपरा भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायाच्या शिकवणीवर आधारित आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी भक्तिमार्गाचा प्रसार करत समाजाला एकत्र आणण्याचे कार्य केले. या संतांच्या विचारांचा वारसा आजही पालखी सोहळ्यांच्या माध्यमातून जपला जातो.
यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव कधी?
यंदा मुंबईतील गणेशोत्सव १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ (अनंत चतुर्दशी) या कालावधीत साजरा होणार आहे. या दहा दिवसामध्ये बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मंडळामध्ये गर्दी करतात.
(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2026 02:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

