मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस; महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Nawab Malik (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विधानपरिषद निवडणूका घेणे शक्य नाही. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपालांनी शिफारस केलेल्या रिक्त दोन MLC पदांसाठी ही शिफारस करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

त्यामुळे कुठला घटनात्मक तिढा निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, येत्या 24 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतील 8 जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज भरु शकत होते. मात्र, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रम नियोजित वेळनुसार पार पडू शकणार नाही. निवडणूक आयोगानेच तसे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच होणार आमदार; घटनात्मक पेच टळला तर सरकार वाचणार

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बिहारमधील 9 आणि महाराष्ट्रातील 8 तसेच धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यावयाची एक अशा नऊ जगांसाठी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. उद्धव ठाकरे या 9 जागांपैकी एका जागेवरुन निवडणूक अर्ज भरु शकत होते. त्यामुळे 2 मे रोजी अधिसूचना जारी केली आणि 26 मे पर्यंत निवडणूक झाली तरी त्यांना परिषदेवर जाणे शक्य आहे.