Mumbai: कुर्ला परिसरात 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून आरोपीला अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

निर्भया हत्याकांड, हैदराबाद येथील युवतीवर झालेला बलात्कार (Rape) अशा घटना पाहता देशात स्त्रिया खरच सुरक्षित आहे का? असा प्रश्न पडतो. अशात आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या (Mumbai) कुर्ला (Kurla) परिसरात 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पीडितेच्या कुटूंबाने केलेली तक्रार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना या आरोपीस पकडण्यात यश आले. या मुलीला सध्या रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.

एएनआय ट्विट -

दरम्यान, या आधी 19 ऑगस्ट रोजी मुंबईच्या मानखुर्द परिसरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपाखाली, तिचा भाऊ आणि अन्य तीन लोकांना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्यांमध्ये मुलीचे आई आणि वडिलांचाही समावेश होता. या मुलीला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडल्याचा आरोप आईवर केला होता. (हेही वाचा: कशा सुरक्षित राहतील महिला? महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी 'निर्भया फंड'चा एक पैसाही खर्च केला नाही, अहवालातून मिळाली धक्कादायक माहिती)

दरम्यान सध्या देशात घडत असलेल्या बलात्काराच्या घटना पाहता, महिलांच्या संरक्षणासाठी किती पैसे खर्च झाले याबाबत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. निर्भया फंडांतर्गत महिलांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने राज्यांना मदत पुरवली होती. अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, पाच राज्यांनी या रकमेतील एक पैसादेखील खर्च केला नाही. तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आलेल्या रकमेपैकी फक्त 9 टक्के रक्कमच स्त्रियांच्या सुरक्षेसाठी खर्च करण्यात आली आहे.