आज राज्यभरातील सुमारे 9000 पेक्षा अधिक शाळा बंद राहणार आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण महामंडळाने सांगितले. गेल्या चार ते सहा वर्षांपासून आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहोत, असा दावा शिक्षकांनी केला आहे.
शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले की, "राज्य सरकारच्या सर्व शाळांमध्ये 2012 पासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारांची नेमणूक थांबवण्यात आली आहे. शिक्षकांच्या भरतीमध्ये सातत्याने विसंगती निर्माण होत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आम्ही अनेकदा आमच्या समस्या सरकारपुढे मांडल्या आहेत."
राज्यभरातील सुमारे 9000 शाळा या संपात सहभागी झाल्या आहेत. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचे लक्ष वेधणयासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींचे शिक्षकांवर ओझे लादण्यात आले आहे. त्याबदल्यात अपेक्षित पगारवाढही मिळालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शिक्षकांच्या इतरही काही मागण्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.