Coronavirus: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 79 प्रकरणांची नोंद; शहरातील संक्रमितांची एकूण संख्या 775 वर
Coronavirus cases | (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) आज कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमणाची 79 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली असून, शहरातील एकूण कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 775 झाली आहेः बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) याबाबत माहिती दिली. बीएमसीने पुढे सांगितल्याप्रमाणे, मुंबईच्या धारावी येथे आज कोरोना विषाणूचे 3 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे येथील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 17 वर पोहचली आहे. यामध्ये 3 जणांच्या मृत्यूचाही समावेश आहे. मुंबई मध्ये आज एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला, तर  6 रुग्ण बरे झाले आहेत. या नऊही जणांना दीर्घकालीन आजार होते.

एएनआय ट्वीट - 

गुरुवारी 9 एप्रिल रोजी, महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 162 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी 143 जण मुंबईचे आहेत. एका दिवसात ही नवीन रूग्णांची सर्वाधिक संख्या आहे. आज दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींपैकी सांगली येथून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. सांगलीतील एकूण 25 कोरोना व्हायरस रुग्णांपैकी, 14 पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित 11 रूग्ण स्थिर व बरे आहेत. (हेही वाचा: पुण्यात आज आणखी 3 कोरोना बाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात मृतांची संख्या 21 वर)

मुंबईमधील जी दक्षिण प्रभाग अंतर्गत येणारा वरळी परिसर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे एक केंद्र बनला आहे. येथे एका दिवसात 55 नवीन रुग्ण आढळले आहेत, एका दिवसात वॉर्डात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोना सह्वासितांचा शोध घेण्यासाठी वृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनेक चमु तर्फे आजपर्यंत 15 लाख पेक्षा जास्त नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि 2806 अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेऊन चाचणी करण्यात आली. या साथीच्या आजारामुळे कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढती संख्या लक्षात घेता, मुंबईत जलद तपासणीची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) लवकरच दक्षिण कोरियाकडून 1 लाख चाचणी किट खरेदी करणार आहे.