हरिनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, हजारो वारकऱ्यांच्या सानिध्यात मोठ्या थाटामाटात माऊलींचा 723 वा संजीवन समाधी दिन सोहळा आळंदी येथे रंगला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर अभिषेक करण्यात आला. यानिमित्त इंद्रायणी नदीच्या तीरावरील असंख्य वारकऱ्यांनी गुलाल, बुक्का आणि फुलांची ओंजळ वाहून माउलींना भावपूर्ण नमन केले. आळंदी लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे कार्तिकी दिवशी हा सोहळा भक्तांसाठी महत्वाचा असतो.
काल (मंगळवार) द्वादशीनिमित्त लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत कार्तिकीवारी सोहळ्यातील रथोत्सवाचा कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. माऊलींचा चांदीचा मुखवटा रथामध्ये ठेवून त्याची परंपरेप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली. ‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’ अशा गजरात वारकऱ्यांनी माउलींचा रथ ओढून नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 723 व्या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदीत भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आळंदीत आले आहेत.
यानिमित्त सकाळी दहा ते बारा या वेळेत संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज यांचे देऊळवाड्यात कीर्तन पार पडले. त्यानंतर घंटानाद, पुष्पवृष्टी वर्षाव, आरती आणि महाप्रसादअसा कार्यक्रम असणार आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री पांडुरंगाच्या पादुका यावर्षीही आळंदी कार्तिकी वारीसाठी हरिनाम गजरात आल्या आहेत. इंद्रायणी तीरावरील मल्लाप्पा वासकर महाराज यांच्या फडावर या पादुकांच्या दर्शनासाठी ठेवल्या आहेत.