राजपत्रित वर्ग-2 नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मुद्यावरुन राज्यातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरुन 4800 रुपये वाढवण्याची त्यांची मागणी आहे.
नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वाढवून वर्ग दोनवर 1988 साली राज्यसरकारकडून करण्यात आला होता. मात्र त्यांची वेतनवाढ ही करण्यात आली नव्हती. मागील अनेक वर्षे राज्यातील नायब तहसीलदार हे वर्ग दोन या पदावर काम करत आहे. मात्र त्यांचे वेतन हे वर्ग तीनच्यानुसार येत आहे. सध्याची त्यांची मागणी मान्य केल्यास राज्यातील 2200 नायब तहसीलदारांना त्याचा फायदा होईल, मात्र सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्ष 2.64 कोटी रुपयांचा बोजा आणखी वाढेल.
सध्या तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे कामही तहसीलदारांना करावे लागते. जमीन महसुलाची कामे, अतिवृष्टीचे पंचनामाचे, कारवाईची कामे, स्वस्त धान्य दुकानदारांवर देखरेख करुन काळाबाजार रोखणे, निवडणूक अधिकारी म्हणून तालुक्याची जबाबदारी पार पाडणे, तहसील कार्यालयातील विविध विभागातून दिले जाणारे दैनंदिन दाखले या सर्व कामावर या संपामुळे मोठा परिणाम पडताना दिसेल. यामुळे या संपाच्या प्रश्न राज्यशासनाने लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणीही करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापुर्वी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता. आता हा पुन्हा संप झाल्यास राज्यातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांना याचा सर्वात मोठा फटका पडताना दिसेल.