पुण्यात कोरोनाचा हाहाकार! 4447 नव्या रुग्णांसह जिल्ह्यात COVID-19 संक्रमितांची संख्या 1,93,013 वर
Coronavirus (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असताना सुरुवातीच्या काळात राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या मुंबईला मागे टाकत पुणे जिल्ह्यात (Pune District) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत पुणे जिल्हा पहिल्या स्थानी असून दुस-या स्थानी मुंबई आहे. पुण्यात काल (6 सप्टेंबर) दिवसभरात 4447 नवे कोरोनाचे रुग्ण (COVID-19 Cases) आढळले असून 80 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे आरोग्य विभागाने (Pune Health Department) दिली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1 लाख 93 हजार 13 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 4,575 (COVID-19 Death Cases) वर गेला आहे. ही आकडेवारी पाहता पुण्याभोवती कोरोना व्हायरसचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यात काल 2819 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1,53,936 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला जिल्ह्यात 23,596 रुग्णांवर उपचार सुरु असून 11,001 रुग्ण हे होम क्वारंटाईन (Home Quarantine) आहेत. पुण्यात आतापर्यंत 8,40,710 कोरोना चाचण्या झाल्या असून त्यातील 14,703 चाचण्या काल दिवसभरात घेण्यात आल्या.

दरम्यान राज्यात काल दिवसभरात तब्बल 23,350 इतक्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद (Coronavirus Cases In Maharashtra) झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 9,07,212 वर पोहोचली आहे. यात उपचार घेऊन आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या 6,44,400 जणांचा आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 26604 जणांचाही समावेश आहे. तसेच, एकूण संख्येत ( 9,07,212) राज्यात विद्यमान स्थिती प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 2,35,857 रुग्णांचाही समावेश आहे.