वडाळा येथील तरुणाच्या मुंडण प्रकरणी 4 शिवसैनिकांना अटक; सीएम उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध लिहिली होती आक्षेपार्ह पोस्ट
राहुल उर्फ हिरामणी तिवारी (संग्रहित संपादित प्रतिमा)

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या एका व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण करत, सर्वांसमक्ष त्याचे मुंडण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. राहुल उर्फ हिरामणी तिवारी (Hiramani Vijendra Tiwari) असे या व्यक्तीचे नाव असून तो वडाळा येथील रहिवासी आहे. याबाबत राहुलने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत आता मुंबई पोलसिांनी चार शिवसैनिकांना अटक केली आहे. 19 डिसेंबर रोजी राहुलने मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती.

एएनआय ट्वीट -

देशात नागरिकत्व कायद्याविरोधात (Citizenship Amendment Act) मोठे आंदोलन पेटले आहे. असेच आंदोलन जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांनीही केले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. या घटनेबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत या हल्ल्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यानंतर राहुलने याबाबत टीका करत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली. यामुळे भडकलेले स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर व अन्य 20-25 शिवसैनिकांनी राहुलचे घर गाठले व त्याला मारहाण केली. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध लिहिली आक्षेपार्ह पोस्ट; शिवसैनिकांनी घरात घुसून केली मारहाण व मुंडण)

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राहुलचे केस कापून मुंडणही केले. याबाबत राहुलने पोलिसांकडे तक्रार केल्यावर, पोलिसांनी दोन्ही पक्षांना 149 ची नोटीस पाठवली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी चार शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. समाधान जुगधर, प्रकाश हसबे, श्रीकांत यादव आणि सत्यवान कोळंबेकर अशी अटक झालेल्या लोकांची नावे आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी याबाबत राहुलचे समर्थन केले होते. त्यांनी वडाळा येथे राहुलची भेटही घेतली होती.