महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत आढळले 371 नवे रुग्ण, कोरोना बाधितांची एकूण संख्या 19,756 वर
Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची (Coronavirus Positive) संख्या वाढत असून या परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलिसांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 371 नवे रुग्ण आढळले असून 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिस विभागाने दिली आहे. यामुळे महाराष्ट्र पोलिस एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 19 हजार 756 (COVID-19 Cases) वर पोहोचला असून मृतांची संख्या 202  (COVID-19 Death Cases) वर पोहोचली आहे. राज्यात सद्य घडीला 3,724 (COVID-19 Active Cases) पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यात दिलासादायक गोष्ट म्हणजे कोरोनाची दोन हात करून महाराष्ट्र पोलिस दलातील 15,830 (COVID-19 Recovered Cases) पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी दिवसरात्र जनतेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र पोलिसांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या कामाप्रती निष्ठा दाखवत जनतेच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे हेच या परिस्थितीवरून दिसत आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 83,809 नव्या रूग्णांची भर एकूण कोरोनाबाधित 49 लाखांच्या पार

राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 77 हजार 374 वर पोहोचली आहे. ही संख्या राज्यातील कोरोनाची बिकट परिस्थिती दर्शवित आहे. राज्यात सद्य घडीला 2 लाख 91 हजार 256 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. तर भारतात सध्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 49,30,237 पर्यंत पोहचला आहे. त्यामध्ये अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 9,90,061 आहे तर आत्तापर्यंत सुमारे 38,59,400 रूग्णांनी कोरोना व्हायरसमुळे होणार्‍या कोविड 19 या आजारावर मात केली आहे. तर 80,776 जणांची कोरोनाविरूद्धची लढाई अयशस्वी ठरली आहे.