प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Wikimedia Commons)

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक त्यांच्या विविध मागण्यांसाठी आज पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. गेले अनेक महिन्यांपासून सरकारसमोर प्राध्यापकांची अनेक मागण्यांसाठी निदर्शने चालू आहेत, मात्र आजतागायत शासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आता या प्राध्यापकांच्या एमपुक्टो संघटनेनं पुकारलेल्या या संपात राज्यभरातील जवळजवळ 25 हजार प्राध्यापक सहभागी होणार आहेत. राज्यामध्ये प्राध्यापक भरती पुन्हा सुरू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, 71 दिवसांचे थकीत वेतन मिळावे, घडय़ाळी तासिका तत्त्वावरील आणि करार तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन वाढवावे, 2005 नंतर सेवेत आलेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, नामनिर्देशन पद्धतीमुळे झालेला गोंधळ दूर करण्यासाठी विद्यापीठ कायद्यात दुरुस्ती करून वटहुकूम काढावा, अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या वेतनाची स्वतंत्र नियमावली करावी अशा अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे.

याआधीही 11 सप्टेंबरला प्राध्यापकांनी एक दिवसाचा संप पुकारला होता. तसेच त्याआधी तब्बल 71 दिवस शिक्षक संपावर गेले होते. मात्र त्यावेळीही सरकारने या संपाकडे दुर्लक्ष केले होते. आणि त्या 71 दिवसानाचे वेतनही सरकारकडून दिले गेले नव्हते. मात्र आता आपण आपल्या संपावर आणि मागण्यांवर ठाम राहणार असल्याची माहिती शिक्षक संघटनेने दिली आहे.

दरम्यान हा संप होणार असल्याची पूर्वकल्पना प्राध्यापकांकडून देण्यात आली होती. त्यामुळे सरकारकडून संघटनेला चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मंगळवारी (25 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता मंत्रालयात ही बैठक होणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. लवांडे यांनी दिली.