Men's Lifestyle : मॉर्निंग रुटीन आणि फेसवॉश चे महत्व जाणून घेतल्यानंतर स्वतःला ग्रूम करण्याच्या प्रक्रियेमधील पुढचा टप्पा म्हणजे क्लीन आणि क्लिअर झालेली त्वचा मेंटेन करून ठेवणे. यासाठी वेळोवेळी क्लिंझरचा वापर, स्कार्ब करणे हे गरजेचे आहे. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते. मात्र या व्यतिरिक्त अजून काही उपायांनी आपण चेहऱ्याचा उजळपणा टिकवून ठेऊ शकतो. यासाठी आठवड्यातून दोनवेळा काही पॅकचा वापर, तसेच घरच्या घरी जाता जाता इतर अनेक उपाय करू शकता. मुलतानी माती, चारकोल मास्क हे काही पॅक सर्रास वापरले जातात. यामध्ये आसलेल्या घटकांमुळे चेहरा उजळ होण्यास मदत होते, त्वचेची मुलायमता टिकून राहते, पिंपल्सची समस्या दूर होते. चला तर पाहूया काय आहेत हे उपाय.
टोमॅटो – चेहऱ्याच्या उजळपणासाठी सर्वात गुणकारी घटक म्हणजे टोमॅटो. दररोज आंघोळीआधी टोमॅटोच्या फोडी हलक्या हाताने चेहऱ्यावर चोळा (याऐवजी टोमॅटोचा रसदेखील वापरू शकता). साधारण 15 मिनिटे हा टोमॅटो चेहऱ्यावर राहू दे, त्यानंतर क्लिंझरचा उपयोग करून चेहरा स्वच्छ धुवा. 7 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल.
कोरफड – चेहरा आणि केसांच्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी कोरफड अतिशय गुणकारी आहे. कोरफडीचा रस अथवा गर जमेल तसे चेहऱ्यावर लावा, 20 मिनिटांनंतर चेहरा धुवा. हा प्रयोग रोज केल्यास 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल.
या दोन घटकानंतर मुलतानी मातीदेखील चेहऱ्याचे सावळेपण दूर करण्यास मदत करते. मात्र मुलतानी माती ही कोरडी असते, त्यामुळे थेट तुम्ही ती चेहऱ्यावर लावू शकत नाही, त्यासाठी त्यात काही घटक मिसळणे आवश्यक आहे.
मुलतानी माती पॅक घटक – साधारण 2 मोठे चमचे मुलतानी माती, मध, लिंबू रस, गुलाब पाणी, शक्य असल्यास कोरफड आणि टी ट्री ऑईलचे 2 थेंब (हे कोणत्याही मेडिकलमध्ये उपलब्ध आहे)
हे सर्व घटक एकत्र करून पेस्ट तयार करा (जास्त पातळ नको) ही पेस्ट साधारण 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर फेसवॉचशने चेहरा धुवा. तुम्हाला त्वरित रिझल्ट मिळेल.
लक्षात ठेवा, मुलतानी माती जास्त वेळ चेहऱ्यावर ठेऊ नका, त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. तसेच काही लोकांना मुलतानी माती आणि टी ट्री ऑईलची अॅलर्जी असू शकते, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हा पॅक वापरा.