Karnatak Hijab Controversy: हिजाब बंदी'वरून कर्नाटकात तणाव, सर्व शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस राहणार बंद
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

कर्नाटक राज्यातील शैक्षणिक संस्था तीन दिवसांसाठी बंद (All Schools And Colleges Closed For Three Days) ठेवण्यात आल्या आहेत. हिजाब बंदीमुळे (Hijab Controversy) राज्यभरात झालेल्या हिंसक निदर्शनांमुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, राज्य सरकार या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेल. तसेच विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. ट्विटरवर बोम्मई यांनी लिहिले की, "मी विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा आणि महाविद्यालयांचे व्यवस्थापक तसेच कर्नाटकातील जनतेला राज्यात शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन करतो. मी पुढील तीन दिवस सर्व हायस्कूल आणि कॉलेजेस बंद ठेवणार आहेत. याआधी, स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले होते की राज्यातील उडुपी शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी हिजाब परिधान केलेल्या मुलींना प्रवेश दिला नव्हता.

Tweet

उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये भगवी शाल ओढलेले विद्यार्थी आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्याने तणाव वाढला. सोशल मीडियावर मंडायातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मुलांचा एक गट हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींशी गैरवर्तन करताना दिसतोय. सोशल मीडियावर या मुलींच्या बाजूने पाठिंबा वाढला. हिजाब घालण्याच्या अधिकारावर आपण ठाम आहोत आणि आपल्याला शिक्षकांचा पाठिंबा आहे. भगवी शाल ओढलेल्या ज्या मुलांनी रोखले ते बाहेरचे होते, असा दावा त्या विद्यार्थिनीने केला आहे. (हे ही वाचा Karnataka Hijab Ban: 'आम्ही भावनेचे नव्हे तर संविधानाचे पालन करू'; कर्नाटकातील हिजाब वादावर उच्च न्यायालयाचे म्हणणे)

हिजाब वादावरून तणाव वाढला आहे. बागलकोटमधील राबकावी बनहट्टी येथे दगडफेकीची घटना घडली. काही विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून त्यांना पांगवले. या घटनेत काही विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवमोगा जिल्ह्यातही अशीच घटना समोर आली आहे. तेथे विद्यार्थ्यांसह काही जणांना ताब्यात घेण्यात आले. शिवमोगा शहरात दोन दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

हिजाबचे पडसाद महाराष्ट्रातही

कर्नाटक येथील हिजाब प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रातही बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात बीड, नाशिक, मुंब्रा, भायखळा या ठिकाणी हिजाबच्या समर्थनार्थ मुस्लीम संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबईत मुस्लीम महिला रस्त्यावर उतरल्या असून मुस्लीम संघटनांकडून सह्यांचं कॅम्पेन राबवलं जात आहे.