Odisha: ओडिशामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या भाषणादरम्यान वीज खंडित (Power Cut)झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराजा श्री रामचंद्र भांजदेव विद्यापीठाच्या 12व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती संबोधित करत होत्या. यावेळी वीज गेली. त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी अंधारात भाषण सुरू ठेवले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या वेळी 9 मिनिटे वीज खंडित झाल्यानंतर सर्वत्र टिका होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी सकाळी 11.56 ते दुपारी 12.05 वाजेपर्यंत नऊ मिनिटे वीज खंडित झाली होती. वीज नसल्याने संपूर्ण सभागृहात अंधार होता. मात्र, या अंधारातही राष्ट्रपतींनी आपले अभिभाषण सुरूच ठेवले. (हेही वाचा - Mallikarjun Kharge आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा भाजपचा डाव; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप)
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतरही द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करणे थांबवले नाही. राष्ट्रपती हसत हसत म्हणाल्या की, आजचा हा कार्यक्रम बघून विजेलाही आमचा हेवा वाटू लागला आहे. तथापी, कार्यक्रमादरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने वीज विभागाने आपल्या चुकीबद्दल खेद व्यक्त केला आहे. माहिती व जनसंपर्क विभागानेही चूक मान्य केली आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती प्रोफेसर गणेशी लाल, मंत्री प्रदीप कुमार अमत आणि कुलगुरू संतोष त्रिपाठीही उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातही वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेचा सर्वसामान्य जनतेकडून निषेध होत आहे. या घटनेनंतर मयूरभंज जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत. तथापी, तपासासाठी त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे.