पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab and Haryana High Court) एका अशा घटस्फोटाच्या (Divorce) निर्णयाला मान्यता दिली आहे ज्यात अपंग पतीने आपल्या पत्नीने आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता आणि म्हटले होते की तिच्या छळामुळे त्याचे तब्बल 21 किलो वजन कमी झाले आहे. पतीने न्यायालयाला सांगितले होते की, पूर्वी त्याचे वजन 74 किलो होते आणि पत्नीच्या अत्याचारामुळे ते कमी होऊन 53 किलो झाले. हिसार कौटुंबिक न्यायालयाने या पती-पत्नीला घटस्फोटाचा निर्णय दिला होता, ज्याला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानेही हिसार न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
या प्रकरणामध्ये पत्नीनेही पतीविरुद्ध खोटे आरोप केले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, पत्नीची याचिका फेटाळताना, उच्च न्यायालयाने पतीविरोधातील फौजदारी खटले आणि तक्रारींना खोटे ठरवले आणि म्हटले की, अशा प्रकरणांमुळे पतीवर मानसिक अत्याचार झाले आहेत. पत्नीने पतीवर हुंडा मागितल्याचा आरोप देखील केला होता, जो न्यायालयात खोटा असल्याचे सिद्ध झाले. 27 ऑगस्ट 2019 रोजी हिसार न्यायालयाने पती-पत्नीमधील घटस्फोटाला परवानगी दिली होती, ज्याला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
संबंधित प्रकरणातील पती-पत्नीचे लग्न एप्रिल 2012 मध्ये झाले होते आणि दोघांना एक मुलगी आहे. पीडित पतीला कानाने कमी ऐकू येत आहे त्यामुळे तो अपंग प्रवर्गात समाविष्ट आहे. कोर्टात, पतीने त्याच्या बाजूने सांगितले होते की त्याची पत्नी संतापी स्वभावाची आहे आणि तिने कधीही तिच्या सासरच्या लोकांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला नाही. ही बायको छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडते ज्यामुळे कुटुंबासमोर अनेक लाजिरवाणे प्रसंग उभे राहिले आहेत. असे असूनही भविष्यात सर्व काही ठीक होईल असा विचार करून तो गप्प राहिला. मात्र सर्व प्रयत्न करूनही पत्नीचा स्वभाव बदलला नाही आणि पत्नीमुळे त्याला मानसिक छळ सहन करावा लागला. (हेही वाचा: Kerala Murder Case: कौटुंबिक वादाला कंटाळून पत्नीने चाकूने वार करत पतीची केली हत्या, पोलिसांनी आरोपीला घातल्या बेड्या)
सुनावणी दरम्यान, उच्च न्यायालयाच्या समोर आले की पत्नी 2016 मध्ये तिचा अपंग पती आणि मुलीला सोडून माहेरी निघून गेली होती. त्यानंतर तिने परतण्याचा प्रयत्न केला नव्हता. न्यायालयाला असेही आढळले की सासरच्या मंडळींकडून कधीही हुंड्याची मागणी झाली नव्हती. सासरच्यांनी महिलेच्या उच्च शिक्षणाचा खर्चही उचलला होता. अशाप्रकारे महिलेने पती आणि सासरच्या लोकांविरोधात खोटी तक्रार केल्याचे न्यायालयाला आढळले. या सर्व गोष्टी मानसिक छळाच्या श्रेणीत येतात असे कोर्टाचे म्हणणे आहे.