महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी, 12वी च्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता सध्या विद्यार्थ्यांना लागली आहे. रिपोर्ट्सनुसार यंदा MSBSHSE चे निकाल मे महिन्यातच लागणार आहेत. त्यामुळे आता निकालाच्या तारखेचे वेध विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील लागले आहे. बोर्डाकडून पहिल्यांदा मे महिन्याच्या मध्यावर 12वीचा आणि नंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 10 वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. आता काही मीडीया रिपोर्ट्सनुसार, 11 मे दिवशी बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाऊ शकतो असं सांगण्यात आले आहे. मात्र यावर अद्याप बोर्डाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सामान्यपणे निकालाची तारीख ही बोर्डाकडून एक दिवस आधीच जाहीर केली जाते. सकाळी ऑनलाईन आणि नंतर ऑफलाईन स्वरूपात गुणपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या जातात. आता टॉपर्स लिस्ट जाहीर करण्याची रीत बंद केली असल्याने केवळ आकडेवारी जाहीर करत बोर्डाकडून 10वी, 12वीचे निकाल जाहीर केले जातात.
विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईट वरच पाहता येणार आहे. यंदा 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च, तर 10वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या आहेत. 15-16 लाख विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले आहेत. आता त्यांचे विभागीय मंडळानुसार निकाल जाहीर केले जातील.
10 वी, 12वी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35% गुण आवश्यक आहेत. बोर्डाचा निकाल हा बेस्ट ऑफ 5 धोरणावर लावला जातो. म्हणजे सर्वोत्तम कामगिरी केलेल्या 5 विषयांच्या गुणांच्या आधारे निकालाची टक्केवारी निकालात दिलेली असते.
मागील वर्षी बोर्डाने 12वीचा निकाल 25 मे दिवशी तर 10वी चा निकाल 2 जून दिवशी जाहीर केला होता.