Devendra Fadnavis (PC - ANI)

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) भाजपसोबत (BJP) येण्याची इच्छा होती, असा गौप्यस्फोट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यासंदर्भात चर्चादेखील झाल्या होत्या. परंतु, भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून हे आपल्याला करता येणार नाही असं सांगितलं. राष्ट्रवादी आणि भाजप जर सोबत येणार असेल, तर शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं. जर एकत्र जायचं असेल आणि काँग्रेसला बाजूला ठेवायचं असेल, तर शिवसेना आम्हाला सोबत लागेल. शिवसेनेशिवाय आम्ही तुम्हाला घेत नाही, असं गृहमंत्री अमित शहां यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितलं होतं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही. याबाबत योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातील एका चर्चेत मी होतो. एका चर्चेत मी नव्हतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (हेही वाचा - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करणं हा एकमेव उपाय ठरू शकतो - देवेंद्र फडणवीस)

राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाण्यासंदर्भात टोकाच्या चर्चा झाल्या होत्या. परंतु, त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भूमिका बदलली. आम्ही शांत बसून होतो. त्यानंतर 2 ते 3 दिवस असे होते की, आम्ही मनातून ठरवलं होतं की आपल्या हातात हे सरकार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. राज्य सरकारने टेस्टिंग वाढवावी, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना आर्थिक मदत करावी. तसेच राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करणं हा एकमेव उपाय ठरू शकतो, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.