मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील रिक्षा चालकांनी 8 जुलै ला मध्यरात्री 12 पासून बेमुदत संपावर (Auto Rickshaw Strike) जाणार असल्याची घोषणा केली होती. ऐन पावसाळ्यात हा संप पुकारला गेल्याने जनतेचे धाबे दणाणले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. ही माहिती ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृति समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष शशांक राव (Shashank Rao) यांनी दिली आहे. राव यांनी एक पत्रक जारी केले आहे, त्यामध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा चालकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करा या मुख्य मागण्या आहेत. यासाठी 9 जुलै पासून संपाची हाक देण्यात आली होती. यामध्ये देशातील प्रमुख शहरांमधील रिक्षा चालक सहभागी होणार होते. मात्र जनतेची होणारी गैरसोय ओळखून मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यावर आता उद्या होणारा हा संप होणार नसल्याची माहिती मिळत आहे. (हेही वाचा: 9 जुलै मध्यरात्री पासून रिक्षा चालकांचा बेमुदत संप, भर पावसात जनतेची परवड)
रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री रिक्षा चालक संघटनेशी बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थिती ही बैठक, मंगळवारी दुपारी 3 वाजता होणार आहे. या बैठकीत जो काही तोडगा निघेल त्याच्यावर पुढील पाऊल ठरेल असे शशांक राव यांनी सांगितले आहे. मात्र या चर्चेमधून आपल्याला न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.