पुणे शहराचं नाव बदलून 'जिजापूर' करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

पुणे शहराचं नाव बदलून 'जिजापूर' करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी (Photo: Wikipedia)

पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या संदर्भात राज्य सरकार पत्र पाठवण्यात आले असून या प्रस्तावावर लवकरात लवकर पाऊलं उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला पाठिंबा दर्शवत पुण्याचं नाव जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईंचा अर्थात राजमाता जिजाऊंचा वारसा या शहराला आहे. जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवत हे शहर वसवलं. पुणे शहाराच्या सध्याच्या स्थितीमागे जिजाऊंचे योगदान आहे आणि ते विसरता येणार नाही," असेही संतोष शिंदे यावेळी म्हणाले.

महारांच्या आशीर्वादाने हे सरकार स्थापन झालं असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा म्हणतात. त्यामुळे या प्रस्तावाचा कोणीही निषेध करणार नाही, अशी अपेक्षाही संभाजी ब्रिगेडने व्यक्त केली आहे.

यासंदर्भात संतोष शिंदे आज पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेणार आहेत. जिल्हाधिकारी पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी सरकारपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवतील, अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

अलाहाबादचं नाव प्रयागराज आणि फैजाबादचं नाव अयोध्या केल्यानंतर आता उस्मानाबाद, औरंगबाद, अहमदाबाद आणि हैद्राबादचं नाव बदलण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2018 11:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).