Kaun Banega Crorepati 11 Poster (Photo Credits: Twitter)

मुंबई मधील वडाळा परिसरामध्ये एक धक्कादायक सायबर फ्रॉड समोर आला आहे. सुमारे 2.90 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. 25 लाख रूपयांची बक्षिसं जिंकण्याचं आमिष दाखवून ही फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये केबीसी टीव्ही शो चे लकी ड्रॉ असल्याचं सांगितले जात आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, फसवणूक करण्यात आलेली व्यक्ती KBC या रिअ‍ॅलिटी शो सोबत निगडीत असल्याची माहिती देत त्याने महिलेकडून प्रोसेसिंग फी आणि इतर चार्जेस भरण्यास सांगितले. त्यानंतर बक्षीसाची रक्कम दिली जाईल असाही दावा करण्यात आला.

सायबर फ्रॉडमध्ये अडकलेल्या महिलेने तिच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांकडून पैशांची जुळवाजुळव केली. सोन्याचे दागिने गहाण ठेवून काही पैशांची जुळवाजुळव केली. त्या महिलेला प्रथम व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला. यामध्ये महिलांसाठी एक लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून महिलेने 25 लाखाचे बक्षीस जिंकले आहे. या महिलेला फेक सर्टिफिकेट आणि चेक देखील पाठवला आहे.

सुरूवातीला फसवणूक करणार्‍या व्यक्तीने महिलेकडे 12,500 रूपये बॅंकेमध्ये डिपॉझिट करण्यास सांगितले. हीच त्याची प्रोसिसिंग फी असल्याचे सांगितले. त्यानंतर 30,000 रूपये डिपॉझिट करण्यास सांगितले. हे टॅक्सच्या स्वरूपात असल्याचे सांगत त्यानंतर बक्षीस मिळेल असे सांगितले. अशा प्रकारे सातत्याने केलेल्या आर्थिक व्यवहारामध्ये त्यांनी सुमारे 2.90 लाख रूपयांची लूट केली. काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्या महिलेने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली.