
Traffic Violence Mumbai: मुंबईच्या देशांतर्गत विमानतळाजवळ (Mumbai Airport Cab Incident) एका माणसाला वेगाने जाणाऱ्या कॅबच्या बोनेटवर अनेक किलोमीटर ओढले (Man Dragged By Cab In Mumbai) जात असल्याचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर या धक्कादायक घटनेची पडताळणी करत विमानतळ पोलिसांनी एका कॅब चालकाविरोधात मोटार वाहन कायद्यान्वये Motor Vehicle Act Section 184) गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्याचे वाहन देखील जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (28, मे) पहाटे विमानतळ टर्मिनलजवळ कॅब चालक आणि त्या माणसामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर ही घटना घडली. प्रकरण हातघाईवर आले आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यातच कॅब चालकाने त्या माणसाला धक्काबुक्की केली आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर थरार
कॅबचालक घटनास्थळावरुन पळून जात असताना धक्काबुक्की झालेल्या माणसाने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला. पण कॅब चालक कॅब पुढेच दामटत राहिला. त्यामुळे सदर व्यक्तीने कारच्या बोनेटवर उडी मारली. तरीही कॅब चालक आपले वाहन चालवत राहिला. इतकेच नव्हे तर त्याने बोनेटवर बसलेल्या व्यक्तीसह वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून तो गाडी चालवत राहिला. त्याने त्या माणसाला बराच अंतर बोनेटवर बसवून नेले.
मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल
दरम्यान, या धक्कादायक घटनेचे एका व्यक्तीने व्हिडिओ चित्रिकरण केले. हे फुटेज नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) सादर करण्यात आला. आरटीओने नंतर फुटेज आणि घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना पाठवली. आरटीओने पाठवलेल्या माहितीवरुन पोलिसांनी तपास करुन भीमप्रसाद महांतो नामक चालकास त्याच्या वाहनासह ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या अनेक कलमांखाली - कलम 281, 125, 126 (2), 115(2) आणि 352 - तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएसच्या कलम 35(3) अंतर्गत नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांकडून कारवाईची पुष्टी
Acting on a viral video, the @AirportPSMumbai registered a case against a cab driver who, after a heated altercation near the domestic airport, dragged a man clinging to the bonnet of his car for several kilometers.
An official registered a case against the accused under BNS… pic.twitter.com/BAH2wa8hkD
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) May 29, 2025
मुंबई पोलिसांनी एक्स (जुने ट्विटर) हँडलवर पोस्ट सामायिक करत घटनेबाब केलेल्या चौकशी आणि कारवाईची पुष्टी केली. पोलिसांनी घटनेत सहभागी असलेली कॅब जप्त केली आहे आणि आरोपीला अधिकृत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दिली असून, सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. व्हायरल व्हिडिओमुळे सार्वजनिक सुरक्षितता, आक्रमक वाहन चालवणे आणि शहरातील वाहतूक आणि गुन्हेगारी कायद्यांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज याबद्दल गंभीर चिंता व्यक्त होत आहे. धक्कादायक म्हणजे या आधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.