Raj Thackeray & Uddhav Thackeray | (Facebook PTI)

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे वारे वाहताना दिसत आहेत. यातच भाजप आमदार हेमेंद्र मेहता यांना भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर मेहता यांनी शिवबंधन बांधून घेतले आहे. दरम्यान, मेहता यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांच अभिनंदन करणारे बॅनर्स बोरिवलीमध्ये (Borivali) काही ठिकाणी लावण्यात आले होते. मात्र, आता या बॅनर्सवरुन शिवसेना आणि मनसे (MNS) आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत असलेल्या शिवसेनेकडून भाजपला एकामागून एक धक्के दिले जात आहेत. शुक्रवारी भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शनिवारी भाजपचे आणखी एक माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधून घेतले. मेहता हे तीन वेळा बोरिवलीमध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत. यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याचपार्श्वभूमीवर मेहता यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेने बोरिवलीमध्ये बॅनर लावले होते. परंतु, शिवसेनेकडून लावण्यात आलेले हे बॅनर गुजराती भाषेत असल्याने मराठी भाषेसाठी, अस्तित्वासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाराजी दर्शवली आहे. तसेच‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’असे मजकूर लिहलेले पत्रके त्या बॅनरवर चिटकावून त्याला विरोध केला आहे. हे देखील वाचा- कुख्यात गुंड अरुण गवळी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती उत्तम, जावई अक्षय वाघमारे याने दिली माहिती

मुंबई महापालिकेच्या येत्या 2022 मध्ये निवडणुका पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे गुजराती समाजाचा मेळावा संपन्न झाला झाला. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराजभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्पेश मेहता यांच्या पुढाकारातून मालाडमध्ये हा मेळावा पार पडला आहे. मुंबई मा जिलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपाडा अशी घोषणा देत गुजराती समाजाच्या 21 व्यावसायिकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.