महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदी (Chief Of Shiv Sena) एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. या बैठकीत शिवसेनेचे आमदार, खासदार आणि अन्य नेते सहभागी झाले होते. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता मंगळवारी एकनाथ शिंदे यांची पक्षप्रमुखपदी निवड झाली.
या बैठकीनंतर उदय सामंत यांनी पत्रकारांना संबोधित करत बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती दिली. मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘आज आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली. एकनाथ शिंदे आमच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख असतील. शिवसेनेचा नेता म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करतो. या बैठकीत सरकारने गेल्या सहा महिन्यांत केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.’
सामंत यांनी सांगितले की, या बैठकीमध्ये शिवसेना सचिवपदी सिद्धेश रामदास कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत शिस्तभंग समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद हे मंत्री दादा भुसे यांना देण्यात आले आहे. सदस्य म्हणून मंत्री शंभूराज देसाई आणि संजय मोरे अशी 30 जणांचा या समितीमध्ये समावेश आहे. तसेच ज्या गोष्टीसाठी उठाव केला तशी चूक पुन्हा होऊ नये याचाही ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. (हेही वाचा: श्रीकांत शिंदे यांच्याकडून मला मारण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप)
दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा आदेश रद्द करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर बुधवारी दुपारी 3.30 वाजता कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता शिवसेनेला संसद भवनात (Parliament House) दिलेले कार्यालयही एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे गटाला संसदेमधील शिवसेनेचे कार्यालय देण्याचे आदेश लोकसभा सचिवालयाने दिले आहेत.