Weekly Salary: देशातील 'या' कंपनीमधील कर्मचाऱ्यांना मिळणार दर आठवड्याला पगार; जाणून घ्या सविस्तर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या काळात अनेकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. एकीकडे कंपन्या कर्मचाऱ्यांना उशीरा पगार देत आहेत, तर दुसरीकडे एक कंपनी अशी आहे जी दर आठवड्याला कर्मचाऱ्यांना पगार (Weekly Salary) देणार आहे. म्हणजेच पगारासाठी कर्मचाऱ्यांना महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. यामुळे कर्मचार्‍यांचा आर्थिक भार तर कमी होईलच शिवाय त्यांना अधिक चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. जगातील अनेक देशांमध्ये कंपन्या दर आठवड्याला त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देतात. आता देशातही ही सुविधा सुरू होणार आहे.

इंडियामार्ट (IndiaMART) ने भारतात हा उपक्रम सुरू केला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियामार्ट ही देशातील साप्ताहिक वेतन देणारी पहिली कंपनी आहे. बदलता काळ आणि वाढता आर्थिक भार पाहता त्याची गरज भासत असल्याचे कंपनीने सांगितले. महामारीमध्ये याचे महत्त्व वाढले आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि अमेरिका यांसारख्या अनेक देशांमध्ये कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्याला पगार देत आहेत.

कंपनीने सांगितले की, जागतिक अर्थव्यवस्थेची बदललेली परिस्थिती, कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियामार्टचे सीओओ दिनेश गुलाटी म्हणाले की, कंपनीतील प्रत्येकजण या निर्णयाचे स्वागत करेल. कंपनीने अनेक वर्षांपूर्वी या दिशेने काम सुरू केले होते. इंडियामार्ट ही महामारीच्या उद्रेकानंतर घरून पूर्ण काम करणारी पहिली कंपनी होती. (हेही वाचा: Mukesh Ambani यांनी खरेदी केली 13 कोटींची नवीन Rolls Royce SUV; व्हीआयपी नंबरसाठी खर्च केले 'एवढे' रुपये)

कंपनीचे म्हणणे आहे की, कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार मिळत असल्याने त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे सोपे होईल. त्यांना पगारासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. देशात प्रथमच कोणतीही कंपनी अशी यंत्रणा सुरू करणार आहे.