Social Media | Representational Image (Photo Credits: Pexels)

भारतीय सैन्याने (Indian Army) आपल्या सैनिकांना स्मार्टफोनमधून 89 अॅप्स हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सैन्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्करातून बाहेर पडणारी माहिती रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या अ‍ॅप्समध्ये टिक टॉक (TikTok), ट्रू कॉलर (Truecaller) आणि इंस्टाग्राम (Instagram) इत्यादींची नावे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार नुकतेच या संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, सैनिकांना टिंडर (Tinder) सारखे डेटिंग अॅप्स आणि डेलीहंट सारखे न्यूज अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितले आहे. डेटा सिक्युरिटीच्या मुद्द्यावरून भारत सरकारने चीनच्या 59 अॅप्सवर आधीच बंदी घातली आहे.

एएनआय ट्वीट -

आदेशानुसार प्रत्येकाला 15 जुलैपर्यंत हे अॅप्स मोबाईलमधून काढून टाकावे लागतील. सैन्याच्या संवेदनशील माहितीच्या लीक होण्याचा हवाला देत, हा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कराने म्हटले आहे की, ज्यांच्या कोणाच्या मोबाईलमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम व्यतिरिक्त हे इतर 89 अॅप्स आढळतील. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. गेल्या नोव्हेंबरमध्ये सैन्याने आपल्या कर्मचार्‍यांना अधिकृत कामासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू नये अशी सूचना केली होती. तसेच महत्त्वाच्या पदांवर उपस्थित लष्कराच्या अधिकाऱ्यांना फेसबुक अकाउंट डिलीट करण्यास सांगितले होते. (हेही वाचा: Covid-19 Special Train चा तस्करीसाठी वापर; साडेचार लाख सिगारेट्स जप्त, जुना दिल्ली रेल्वे स्थानकात कारवाई)

सैन्याने सैनिकांना अशा अॅप्सपासून स्वत: ला दूर ठेवण्याचे आदेश दिले आहेत, ज्यांच्यावर कधी ना कधी वैयक्तिक डेटा चोरीचा आरोप लागला आहे. मग ते सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अॅप फेसबुक का असेना. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानी एजंट्सनी 'महिला' बनून, हनी ट्रॅपमध्ये अडकवून लष्करी कर्मचार्‍यांकडून गुप्त माहिती घेतल्या गेल्या असल्याच्या घटना घडल्या आहेत. अलीकडील आदेशानुसार, गोपनीय माहिती आणि राष्ट्रीय सुरक्षा पाहता नौदलानेही आपल्या सर्व कर्मचार्‍यांच्या फेसबुक वापरावर बंदी घातली आहे.