Chenab Rail Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मूमध्ये 6 जून रोजी करणार जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन; जाणून घ्या वैशिष्ट्ये
जम्मू आणि काश्मीरशी व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध असलेल्या लोकांसाठी हा पूल महत्वाचा ठरेल. चिनाब पूल हा जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी गावांना जोडणारा 1,315 मीटर लांबीचा रेल्वे पूल आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 6 जून 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे (Chenab Bridge) उद्घाटन करणार आहेत. उद्धमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पाचा भाग असलेला हा पूल, 359 मीटर उंचीवर उभा आहे आणि पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. या अभियांत्रिकी चमत्कारामुळे काश्मीर खोरे प्रथमच रेल्वेने देशाच्या उर्वरित भागाशी जोडले जाणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि आर्थिक व सामाजिक एकीकरणाला चालना मिळेल.
विशेषतः जम्मू आणि काश्मीरशी व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध असलेल्या लोकांसाठी हा पूल महत्वाचा ठरेल. चिनाब पूल हा जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी गावांना जोडणारा 1,315 मीटर लांबीचा रेल्वे पूल आहे. हा पूल चिनाब नदीच्या पात्रापासून 359 मीटर उंचीवर आहे आणि जगातील सर्वात उंच रेल्वे कमान पूल म्हणून ओळखला जातो. याची मुख्य कमान 460 मीटर लांबीची आहे, जी वक्ररेषीय स्वरूपात 550 मीटरपर्यंत पसरते. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे तीस हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर झाला आहे, ज्यामुळे याला ‘फौलादी पूल’ असेही संबोधले जाते.
हा पूल ताशी 266 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना, भूकंपांना, आणि -10 डिग्री सेल्सियस ते 40 डिग्री सेल्सियस तापमानाला तोंड देण्यासाठी डिझाइन केला आहे. याची आयुर्मर्यादा 120 वर्षे आहे, आणि यावर ताशी 100 किलोमीटर वेगाने रेल्वे धावू शकतात. 2003 मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पाला स्थिरता आणि सुरक्षेच्या चिंतेमुळे विलंब झाला, परंतु भारतीय अभियंत्यांनी हे अशक्यप्राय काम यशस्वी केले. या पुलाने उच्च वेगाचे वारे, अति तापमान, भूकंप आणि हायड्रोलॉजिकल प्रभाव यांचा सामना करण्यासाठी सर्व अनिवार्य चाचण्या यशस्वीपणे पार केल्या आहेत. (हेही वाचा; IndiGo Flight Emergency Landing: 4 हजार फूट उंचीवर इंडिगो विमानाला धडकला पक्षी; रांचीमध्ये करण्यात आले आपत्कालीन लँडिंग)
Chenab Rail Bridge:
History in the making… Just 3 days to go!
The mighty #ChenabBridge, the world’s highest railway bridge, stands tall in #JammuandKashmir.
Part of the Udhampur-Srinagar-Baramulla Railway Link (USBRL). Built to withstand nature’s toughest tests.
PM Sh @narendramodi to… pic.twitter.com/EQnC0m1per
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) June 3, 2025
पंतप्रधान मोदी 6 जून 2025 रोजी चिनाब पुलाचे उद्घाटन करणार असून, याचवेळी कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामुळे काश्मीर खोरे आणि कटरा-श्रीनगर दरम्यानचा प्रवास वेळ कमी होईल, ज्यामुळे पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल. यापूर्वी 19 एप्रिल 2025 रोजी उद्घाटन नियोजित होते, परंतु खराब हवामानामुळे ते पुढे ढकलण्यात आले. महत्वाचे म्हणजे रेल्वेने बांधकाम साहित्याची वाहतूक करता यावी म्हणून, सुमारे 200 किलोमीटर रस्ते बांधले. या रस्त्याने केवळ रेल्वेच्या कामाला मदत केली नाही तर दुर्गम गावांसाठी ते एक आजीवन देणगी बनले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2025 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

