Ramdas Athawale (Photo Credits: Facebook)

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी कोरोनावर (Coronavirus) मात केल्याची माहिती मिळत आहे. तसेच उद्या 8 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे. रामदास आठवले यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. स्वत: त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता त्यांची प्रकृती चांगली झाल्याची समजत आहे.

रामदास आठवले यांना 27 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मागील 11 दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे. याची माहिती मिळताच रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच रामदास आठवले उद्या दुपारी बांद्रा येथील संविधान या त्यांच्या निवासस्थानी परतणार आहे. हे देखील वाचा- Maharashtra MLC Election 2020: उर्मिला मातोंडकर यांचे नाव शिवसेना कोट्यातून राज्यपाल नियुक्त जागेसाठी सूचवण्यामागे 'हे' आहे कारण

कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. दरम्यान, सर्वसामान्यांपासून तर अनेक राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडूदेखील कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, दुग्धविकास मंत्री सुनील केदार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता हे सर्वजणांनी कोरोनावर मात केली आहे.