कजाग सासू सुनांच्या भांडणांमुळे एकमेकींचा जीव घेतल्याच्या अनेक गोष्टी, बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण कोल्हापुरात लोखंडे कुटुंबात सासूच्या मृत्यूच्या धक्क्याने सुनेने आत्महत्या केल्याची एक घटना समोर आली आहे. मालती लोखंडे या 70 वर्षीय सासूचा नैसर्गिक मृत्यू झाला. जेव्हा ही बाब त्यांची सून शुभांगी लोखंडे यांना समजली तेव्हा त्यांना धक्का बसला. अशामध्ये सासूबाईंना वाचवण्यासाठी शुभांगी घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेली. उपासनेच्या खोलीत धूप केला, खोलीत अंगारा फुंकारला. मात्र हे सारे उपाय व्यर्थ ठरले. त्यानंतर घराच्या दुसऱ्या मजल्यावरून शुभांगी खाली कोसळल्या. ही आत्महत्या होती की अपघात याबाबत पोलीस तपास सुरु आहे.
शुभांगी लोखंडे येथून कोसळल्या त्या ठिकाणीही अंगारा पडल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे यामागे अंधश्रद्धेचा काही भाग आहे का? हे तपासून पाहिलं जात आहे.मात्र लोखंडे कुटुंबातील सासू -सुनेच्या मृत्यूने कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोखंडे कुटुंबीय कोल्हापुरात राधानगरी परिसरात राहते. मालती लोखंडे या निवृत्त शिक्षिका होत्या. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यामध्येच त्यांचे निधन झाले. तर शुभांगी यांच्या आई- वडिलांचे छत्र लहानपणीच हरपलं होतं. सासू मालती यांनी तिच्यावर आईप्रमाणे माया केली होती. मात्र इतक्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पचवू न शकल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज आहे.