महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला आहे. निवडणुकीआधी जनतेला दिलेला शब्द सर्वांनी पाळावा, ती सर्व काम करावीत. दरम्यान, राहिलेली काही काम पुढील निवडणुकीच्यावेळी पूर्ण करायची असतात. नाहितर निवडणुकीआधी आश्वासन द्यायचे आणि पुन्हा विसरायचे, अशी शिवसेनेसारखी कामे आपल्याला करायची नाहीत असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना दिला आहे.
चंद्रकांत पाटील हे पुण्यातील एका विकास कामाच्या उद्घाटन समारंभात आले होते. या कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीला सामोरे जाताना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करता आली पाहिजेत. वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातूनही पैसा खर्च करावा. शिवसेनेने निवडणुकीआधी 100 युनिटपर्यंत वीजबिल मोफत देणार, असे आश्वासन दिले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर जनतेला दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. याउलट कोरोना संकटकाळात त्यांनी नागरिकांना वाढीव बील दिला. आमच्या कागलमध्ये तर, पुरामध्ये एकाच घर वाहून गेले. त्या कुटुंबाला चक्क अडीच हजारांचं विज बिल आले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Chandrakant Patil On Shiv Sena: शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका
याआधीही चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहलेल्या पत्रावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ही कुठे तरी वादाची सुरुवात आहे, असे मला वाटत नाही. हवे ते मिळवण्यासाठी नाराजी व्यक्त करायची आणि मिळाले की नाराजी दूर करायची, हा त्यांचा पॅटर्न आहे. मात्र, पहिल्यांदाच सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे पुढे काय ते पहावे लागेल?