'तुला तुझी लायकी दाखवून देईन!' काँग्रेस आमदार शकुंतला साहू यांच्याकडून महिला IPS अधिकाऱ्याला धमकी
Congress Mla Shakuntala Sahu (PC - Facebook)

काँग्रेस आमदाराकडून महिला IPS अधिकाऱ्याला (Female IPS Officer) धमकी देण्यात आली आहे. 'तुला तुझी लायकी दाखवते,' अशा शब्दांत या आमदाराने महिला पोलिस अधिकाऱ्याला धमकी दिली आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कसडोलच्या काँग्रेस महिला आमदाराने 'तुला तुझी लायकी दाखवून देईन,' अशा भाषेत महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावले आहे. या वादामुळे परिसरातील वातावरणात काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता.

शकुंतला साहू, (Shakuntala Sahu) असं या महिला काँग्रेस आमदाराचं नाव आहे. छत्तीसगडमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता. या कामगाराच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. या आंदोलनाची माहिती मिळताचं आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा घटनास्थळी पोहचल्या. त्यावेळी काँग्रेस नेत्या शकुंतला साहू आणि पोलिस अधिकारी अंकिता शर्मा यांच्यात वाद झाला. यावेळी शकुंतला साहू यांनी 'तुझी लायकी दाखवून देईन, अशी भाषा वापरली. तेव्हा 'तुम्ही माझ्या लायकीवर जाऊ नका मॅडम!', अशा शब्दांत महिला अधिकारी अंकिता शर्माने आमदाराला सुनावले.  (हेही वाचा - निर्भया प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती भानुमती यांना आली भोवळ)

छतीसगढमधील बलोदाबाजामध्ये बुधवारी सिमेंट कारखान्यात झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या कामगाराच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी काँग्रेसकडून शकुंतला साहू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते.