Rain In Maharashtra Today 15th May: अवकाळी पाऊस आणि धुळीच्या वादाळाचे सावट; कोकण आणि विदर्भासह अनेक जिल्ह्यांना 'येलो अलर्ट'

महाराष्ट्रातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा आणि वादळाचा इशारा दिला आहे.

Rain In Maharashtra Today 15th May: अवकाळी पाऊस आणि धुळीच्या वादाळाचे सावट; कोकण आणि विदर्भासह अनेक जिल्ह्यांना 'येलो अलर्ट'
X @ANI

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली असून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि स्थानिक हवामान बदलांमुळे पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसध पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर धुळीचे वादळ

मुंबई आणि उपनगरांमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक धुळीचे वादळ आणि ढगाळ हवामान पाहायला मिळाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील काही भागांत दृश्यमानता कमी झाली होती, ज्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीच्या भागात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात 'येलो अलर्ट'

विदर्भातील नागपूर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. हवामान विभागाने येथे मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतही विजांच्या कडाटासह पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तापमानातील चढ-उतार आणि आर्द्रता

पावसाळी वातावरण असूनही मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात उकाडा कायम आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना घामाच्या धारांचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या सरी कोसळल्यानंतर काही काळ गारवा जाणवत असला, तरी आर्द्रतेमुळे 'फील लाईक' तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा ५ ते ६ अंशांनी जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हवामान विभागाने विजांच्या कडाटावेळी झाडांखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली आश्रय न घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडू शकतात, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी. पुढील दोन दिवस हवामान असेच अस्थिर राहण्याची शक्यता आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2026 12:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).