Indian Railways आता 4 ऐवजी प्रवासाच्या 24 तास आधी कन्फर्म करणार तिकीट स्टेटस; धोरण बनवण्याआधी चाचणी प्रायोगिक तत्त्वावर
प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतरच पायलट प्रोजेक्ट धोरणाचा भाग होईल असे आश्वासन रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
सध्या प्रवाशांना भारतीय रेल्वे कडून वेटिंग लिस्टवर असलेल्या तिकीटाचं स्टेटस केवळ 4 तास आधी कळवलं जातं. रेल्वेकडून चार्ट बनवला की स्टेटस अपडेट केले जाते पण त्यामध्ये आता रेल्वे प्रशासन बदल करत असून 4 ऐवजी 24 तास आधी हे स्टेटस कळवलं जाणार आहे. मात्र प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतरच हा पायलट प्रकल्प धोरणाचा भाग बनेल, असे आश्वासन रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
"आम्ही बिकानेर विभागात हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे, जिथे ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी चार्ट तयार केले जातात. सध्याच्या पद्धतीनुसार 4 तास आधी असे केले जात आहे," असे रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले आहेत.
रेल्वे अधिकार्यांच्या माहितीनुसार ही चाचणी प्रवाशांच्या चिंता लक्षात घेऊन केली जात आहे जे वेटिंग तिकिटामुळे त्यांच्या प्रवासाबद्दल अनिश्चित राहतात. "आता, जर त्यांना 24 तास आधी त्यांचे तिकीट कन्फर्म झाल्याचे कळले तर ते त्यांच्या प्रवासाचे अधिक चांगले नियोजन करू शकतात," असे त्यांनी पुढे सांगितले. पण, एकदा तिकीट कन्फर्म झाले की, रद्द केल्यास प्रवाशांना दंड म्हणून तिकिटाच्या रकमेचा मोठा भाग गमवावा लागेल.
तिकीट कॅन्सलेशनचा नियम
तिकीट कॅन्सलेशनच्या धोरणानुसार, जर कन्फर्म केलेले तिकीट ट्रेन सुटण्याच्या 48 तास ते 12 तास आधी रद्द केले तर प्रवाशांना तिकिटाच्या रकमेच्या 25% रक्कम परत मिळेल. जर प्रस्थानाच्या 12 तास ते 4 तास आधी रद्द केले तर त्यांना फक्त 50% रक्कम मिळेल.
"रद्द केल्यामुळे रिक्त होणाऱ्या जागा किंवा बर्थ सध्याच्या बुकिंग प्रणालीद्वारे भरल्या जातील," असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2025 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

