टीम इंडिया (Photo Credit: PTI)

India's Likely Playing XI for 1st ODI: नवीन कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) आता वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) मैदानात उतरणार आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणार आहे. रोहितची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, पण दुखापतीमुळे तो दौऱ्याला मुकला. त्यामुळे मालिकेतील पहिला सामना रोहितचा पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून पदार्पणाचा सामना ठरणार आहे. या मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना प्राधान्य दिले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विंडीजविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडिया खालील संभाव्य प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकते. (IND vs WI 2022: पूर्णवेळ ODI कर्णधार पदार्पणासाठी रोहित शर्मा सज्ज, खास पोस्ट शेअर करून रणशिंग फुंकले See Post)

सलामी जोडी

संघाचा उपकर्णधार केएल राहुल पहिल्या सामन्याला मुकणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मासोबत त्याच जुना सलामी जोडीदार शिखर धवन (Shikhar Dhawan) सलामीला उतरेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत देखील धवन चांगल्या लयीत होता. त्याने या मालिकेत दोन अर्धशतके ठोकली होती. दोघांनी आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 4978 धावा केल्या आहेत. त्यामुळे या दोघांच्या स्टार जोडीकडून संघ आणि चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

मधली फळी

माजी कर्णधार विराट कोहली संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तर चौथ्या स्थानासाठी सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांचा विचार केला जाईल. पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर श्रेयसचा ‘फ्लॉप शो’ आणि सूर्यकुमारला एकही सामना खेळायला न मिळाल्याने यावेळी यादवला पहिले प्राधान्य दिले जाऊ शकते. तर विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करून संघाचा फलंदाजी क्रम मजबूत करेल.

अष्टपैलू

देशांतर्गत क्रिकेट गाजवलेला दीपक हुडा पहिल्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो. हार्दिक पांड्याची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जाणारा व्यंकटेश अय्यरने दक्षिण आफ्रिकेत वनडे डेब्यू केले, पण बॉल आणि बॅटने ठसा उमटवू शकला नाही. परिणामी पहिल्या दोन सामन्यानंतर तिसऱ्या व अंतिम सामन्यासाठी त्याला बाहेर केले गेले. त्यामुळे विंडीजविरुद्ध देखील त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत हुडाला वनडे डेब्यूची संधी मिळू शकते.

गोलंदाजी

शार्दूल ठाकूर, दीपक चाहर आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांसह टीम इंडिया पहिल्या सामन्यात विंडीजना आव्हान देतील. दीपक आणि शार्दूल बॉलसोबत बॅटने देखील प्रभावी योगदान देण्यात सक्षम आहेत. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये हे दोघे भारताच्या फलंदाजी क्रमाला आणखी खोलता मिळवून देतील. तर युजवेंद्र चहल एकमेव फिरकी गोलंदाज असेल आणि कुलदीप यादवला संधीची प्रतीक्षा करावी लागेल.

भारताचा संभावित प्लेइंग XI: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.