Swachh Survekshan 2020: नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाईन सोहळ्यास महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय 12 पुरस्कारांपैकी सर्वाधिक 4 पुरस्कारांसह अन्य 13 असे एकूण 17 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे. सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. याबद्दल सर्व महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या टीमचे विशेष कौतुकदेखील यावेळी शिंदे यांनी केले. (हेही वाचा - Swachh Survekshan 2020 Results: स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या स्थानी; 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत टॉप 3 मध्ये कराड, सासवड, लोणावळा)
आज झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला मिळाला आहे. विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे.
याशिवाय पश्चिम विभाग श्रेणीमधील 25 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता शहर म्हणून जेजुरी तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अकोले शहराला पुरस्कार मिळाला आहे. 25 ते 50 हजार या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीतील शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या विटा शहराला पुरस्कार मिळाला आहे.
शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या वरोरा शहराला देखील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 50 हजार ते एक लाखाच्या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये शाश्वत स्वच्छ शहर म्हणून बल्लारपूरचा गौरव करण्यात आला असून नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आलं आहे. देहू रोड कॅन्टोमेंट परिसराला गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणारे शहर या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे, अशी माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.